Students should take exams in a pleasant atmosphere
विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा
मुंबई : बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे वाढवून दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी आनंददायी तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षांना बुधवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार ३२० केंद्रांवर १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कमी गुण मिळालेल्या अथवा यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
परीक्षा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना
विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तर, परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्रदेखील ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. परीक्षा निकोप व्हाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्यात येत आहेत.
परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी”