Important contribution of technology institutes to make India a global knowledge superpower
भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांचा महत्त्वाचा सहभाग – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण,नवीन संशोधन, कुशल मनुष्यबळ, वाढते तंत्रज्ञान यांचा सहभाग महत्त्वाचा
मुंबई : संशोधन, माहिती तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या आधारावर भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. यामध्ये तंत्रज्ञान संस्थांचा आणि युवकांचा महत्त्वाचा सहभाग आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
‘विकसित भारत@२०४७’ अंतर्गत ‘राष्ट्र निर्मितीमध्ये तरुणांची भूमिका’ या विषयावर उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)मुंबई, येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, आयआयटीचे उपसंचालक के. व्ही. के.राव आणि प्रा. एस. सुदर्शन, विभागप्रमुख, विद्यार्थी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण,नवीन संशोधन, कुशल मनुष्यबळ, वाढते तंत्रज्ञान यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आयआयटी, मुंबईमधील माजी विद्यार्थ्यांनी देश-विदेशात माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडिया, शासन, प्रशासन, शेअरबाजार, खासगी कंपन्या यासारख्या नामांकित क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच जैवतंत्रज्ञान विषयावर आधिक भर देऊन त्यात अनेक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत आणि नवीन संशोधन पुढे येत आहे हे अभिमानस्पद आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जी २० चे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला. यामध्ये “वसुधैव कुटुंबकम्” किंवा “एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य”, पर्यावरणस्नेही जीवनशैली यावर विचारमंथन केले गेले. त्यावेळी भारताची ताकद जगाला दिसून आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच सरकारी सेवा, माहितीची देवाणघेवाण, संप्रेषण व्यवहार आणि विविध स्वतंत्र प्रणाली आणि सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाता आहेत. यामध्ये युवकांनी अधिकाधिक सहभाग घेऊन देशाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी यावेळी केले.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, आयआयटी मुंबई ही देशातील एक नामांकित संस्था आहे. ज्ञान महाशक्ती बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असताना येथील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आणि संधी आहे. उज्ज्वल शैक्षणिक प्रगती, आर्थिक उन्नती आणि नवा बदल घडविण्याचे काम या संस्थेचे माजी विद्यार्थी करत आहेत. आगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. त्याचा सकारात्मक आणि विधायक उपयोग कसा होईल, याबाबत विद्यार्थ्यांनी अधिक संशोधन करण्याची सूचना त्यांनी केली. कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी आयआयटी प्रांगणात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयआयटी मुंबईची चित्रफीत दाखविण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांचा महत्त्वाचा सहभाग”