India UAE CEPA ushers in a new dawn will create a minimum of 10 lakh jobs for Indian citizens: Union Commerce Minister Piyush Goyal
भारत-संयुक्त अरब अमिराती दरम्यान झालेला सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार (सीईपीए) द्वीपक्षीय व्यापाराची नवी पहाट दाखवणारा, भारतीय युवकांसाठी यातून किमान 10 लाख रोजगार निर्माण होतील-केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल
मुंबई : भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात झालेला सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार- (सीईपीए), देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट अप्स, शेतकरी, व्यापारी, आणि इतर सर्व उद्योगक्षेत्रांसासाठी
अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. सीईपीए हा अतिशय संतुलित, न्याय्य, सर्वसमावेशक आणि समान भागीदारी असणारा करार आहे, असे त्यांनी नमूद केले. या करारामुळे भारताला वस्तू आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रांत व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही ते पुढे म्हणाले.
“या करारामुळे आपल्या युवकांसाठी रोजगार निर्माण होतील, स्टार्ट अप्स साठी नवे बाजार खुले होतील. आपला व्यापार अधिक स्पर्धात्मक होईल, ज्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल” असे मत त्यांनी व्यक्त केले. पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही केलेल्या क्षेत्रनिहाय चर्चेनंतर असे आढळले की या करारामुळे भारतीय नागरिकांसाठी किमान 10 लाख रोजगार तयार होतील. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि युएई दरम्यान काल झालेल्या या आजवरच्या सर्वात जलद मुक्त व्यापारी कराविषयी त्यांनी माहिती दिली.
सीईपीए करार दोन्ही देशातील भागीदारीतला मैलाचा दगड ठरणार आहे, असे सांगत दोन्ही देशातील राजकीय नेतृत्व आणि व्यापार यांच्यात इतिहासात निर्माण झालेल्या ऋणानुबंधाना यामुळे अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “केवळ 88 दिवसांच्या कालावधीत हा 880 पानी दस्तऐवज तयार करण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करणे, ही दोन्ही देशांसाठी एक मोठी उपलब्धी आहे. हा करार भारत आणि युएई दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बळ आणि गती देईल आणि दोन्ही देशाच्या नागरिकांच्या आयुष्यात एक नवी पहाट घेऊन येईल.” असे ते म्हणाले.
सीईपीए कराराने कोणत्याही उत्पादनाच्या आयातीत अचानक होणाऱ्या वाढीच्या वेळी मदत करणारी कायमस्वरूपी द्विपक्षीय सुरक्षा यंत्रणा देऊ केली आहे. उत्पादनाच्या 40% मूल्यवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या भरीव प्रक्रियेला आवश्यक असलेल्या उगमस्थानाच्या माहितीबाबत देखील कडक नियमांचा या करारात समावेश आहे. अपेडा, डीपी वर्ल्ड आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अल् दाहरा यांच्यात “अन्न सुरक्षा कॉरीडॉर उपक्रमा”च्या संदर्भात सामंजस्य करार तयार करण्यात आला असून, यामुळे भारत युएईच्या अन्नसुरक्षेत मोठी भूमिका बजावू शकेल, असे गोयल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे राजपुत्र एच.ई.शेख मोहमद बीन झायेद अल नायेन यांच्यादरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषदेदरम्यान करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.