India’s first Everesting competition concludes at Sinhagad
सिंहगडावर देशातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा संपन्न
पुणे : ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या जतनासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सिंपल स्टेप्स फिटनेसतर्फे महाराष्ट्र पर्यटन विभाग व वन विभागाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेत पुण्यासह देशभरातून आलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंहगडावर माउंट एव्हरेस्टच्या ८,८४८ मीटर उंचीइतकी चढाई करण्याचे आव्हान खेळाडूंनी पार पाडले. स्पर्धकांसाठी पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर येथे जेवण, स्वच्छतागृहे आणि पायांची मालिश यांसारख्या सुविधा पुरवण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्टिंग स्पर्धेचे संस्थापक अँडी व्हॅन बर्गन यांनी स्पर्धकांसाठी विशेष व्हिडिओ संदेश पाठवला आणि विजेत्यांना एव्हरेस्टिंग हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्याचे आश्वासन दिले.
स्पर्धा चार गटांमध्ये झाली: एव्हरेस्टिंग सोलो (१६ फेऱ्या), एव्हरेस्टिंग टीम रिले (१६ फेऱ्या), हाफ एव्हरेस्टिंग सोलो (८ फेऱ्या) आणि हाफ एव्हरेस्टिंग टीम रिले (८ फेऱ्या). शिवाय, चांदण्यात सिंहगड किल्ल्याचा अनुभव घेण्यासाठी फन रनही आयोजित करण्यात आला. शाळकरी विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक अशा ७५ स्पर्धकांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.
बलकवडे स्मारकापासून स्पर्धेला सुरुवात झाली. एव्हरेस्टिंग सोलो गटात अपूर्व मेहता (३९:०६:२० तास), पुष्कराज कोरे (४३:११:५४ तास) आणि मेधा जोग (४३:१२:२३ तास) यांनी यशस्वीरीत्या १६ फेऱ्या पूर्ण केल्या. हाफ एव्हरेस्टिंग गटात उमेश धोपेश्वरकर (२१:००:३१ तास), उमेश कोंडे (२१:०४:१६ तास) आणि अपर्णा जोशी (२४:३६:२४ तास) यांनी ८ फेऱ्या पूर्ण केल्या.
टीम रिले गटात सहभागी असलेल्या किरण टीके यांनी हे आव्हान सोलो प्रकारात पूर्ण केले. याशिवाय, योगेश बडगुजर (१८:५६:४५ तास) आणि सुधन्वा जातेगावकर (२०:४९:१४ तास) यांनी अनुक्रमे ९ आणि ८ फेऱ्या पूर्ण करून हाफ एव्हरेस्टिंगसाठी पात्र ठरले.
स्पर्धेचे आयोजन करणारे अशिष कासोदेकर यांनी या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. “तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धांना चालना देणार आहोत,” असे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांनी सांगितले.
ही स्पर्धा भारतातील साहसी क्रीडा प्रकारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण