‘Innovative e-Content’ Award for Colleges and faculties, An initiative of Savitribai Phule Pune University
महाविद्यालय व प्राध्यापकांसाठी ‘इनोव्हेटिव्ह ई कंटेंट’ पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘ई कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेन्टर’ (ईसीडीएलसी आणि ‘सेन्टर फॉर इनोव्हेशन, इंक्युबेशन अँड लिंकेजेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी ई शैक्षणिक साहित्यात नवीन प्रयोग करणारी महाविद्यालये व प्राध्यापकांकडून नामांकाने मागविण्यात आली आहेत.
कोव्हिड महामारीच्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘ईसीडीएलसी’ च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ई शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले. यासाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिकमधील संलग्न महाविद्यालयात शैक्षणिक साहित्यनिर्मितीसाठी स्टुडिओदेखील तयार करण्यात आले.
याबाबत बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, हे ई शैक्षणिक साहित्य तयार करण्यात सातत्य राहण्यासोबतच त्यात नवकल्पनांचा वापर करून नवीन साहित्य निर्माण व्हावे या हेतूने या हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
इनोव्हेशन विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले की, या पुरस्कारासाठी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि संस्था नामांकाने पाठवू शकतात. प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापक कमीत कमी एक तर जास्तीत जास्त पाच नामांकाने पाठवू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२२ असेल.
महाविद्यालयांनी अर्ज करण्यासाठी http://forms.gle/xzFF6NvHfJTdWUeSA
तर प्राध्यापकांनी http://forms.gle/VYxGyGUvYxuYBgfi8 या लिंक वर नामांकाने पाठवायची आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये तयार करण्यात आलेले आणि या वर्षात वापरण्यात आलेले शैक्षणिक साहित्य यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. प्रत्येक महाविद्यालयाला एकच नामांकन पाठवता येईल असेही डॉ. पालकर यांनी सांगितले.