Inauguration of Out Patient Department at Punyashlok Ahilya Devi Holkar Government Medical College
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन
राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात विभाग) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर,अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता, डॉ.अंजली शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर वैद्यकीय योजनाही राबविल्या जात आहेत. रुग्णालयातील आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. बाह्य रुग्ण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमातील उत्तम सेवा देवून चांगले कार्य घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बारामतीतील शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. रुग्णाला उपचारासाठी पुण्यामध्ये पाठवण्यापुर्वी वरिष्ठांनी उपलब्ध सुविधांची खातरजमा करावी. रुग्णालयात दर्शनी भागात इलेक्ट्रॉनिक फलक बसवावेत. डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका व इतर कर्मचारी यांना ओळखपत्र बंधनकारक करावे. रुग्णालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक उपकरणे वापरावी. दर महिन्याला बायोमेट्रिक हजेरीचा आढावा घेण्यात यावा. १०८ क्रमांक रुग्णवाहिकेची माहिती नागरिकांना होणे गरजेचे आहे. रुग्णालयातील एखादे महत्वाचे पद रिक्त झाल्यास तातडीची गरज म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
उल्लेखनीय कार्य करणारे मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. संजय व्होरा, कर्करोग तज्ज्ञ डॉ.चकोर व्होरा, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. प्रसाद सुर्यवंशी, डॉ. ठाकूर डॉ.संतोष भोसले यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
बाह्य रुग्ण विभागांमध्ये अतिदक्षता विभाग, ६ खाटाचं अतिदक्षता विभाग, सुसज्ज असे २ वॉर्ड पुरुष व महिलासाठी तयार करण्यात आले आहेत.
विविध विकासकामांची पाहणी
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कन्हेरी वन उद्यानातील तलाव, जळोची स्मशानभूमी जवळील ओढ्याचे खोलीकरण, बारामती नगरपरिषदेच्या इमारतीचे बांधकाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जवळील वसंतराव पवार नाट्यगृह व शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या इमारतीचे बांधकाम, बारामती नवीन बस स्थानकातील सुशोभीकरण आणि लँडस्केपच्या कामांची पाहणी केली. विकासकामे आकर्षक, दर्जेदार व टिकाऊ असावीत आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन”