India will be among the top 5 global bio-manufacturing hubs by 2025
2025 पर्यंत अव्वल 5 जागतिक जैव-उत्पादन केंद्रांमध्ये भारताचा समावेश होईल : डॉ जितेंद्र सिंह
4 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत जैवतंत्रज्ञानावरील “ग्लोबल बायो-इंडिया – 2023” आंतरराष्ट्रीय संमेलन
नवी दिल्ली : भारताचा 2025 पर्यंत अव्वल 5 जागतिक जैव-उत्पादन केंद्रांमध्ये समावेश होईल असे केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
जैव जैवतंत्रज्ञानामध्ये, जागतिक व्यापार आणि भारताच्या समग्र अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या जैव-अर्थव्यवस्थेची, महत्वपूर्ण साधन बनण्याची क्षमता आहे असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले.
प्रगती मैदानावर 4 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत जैवतंत्रज्ञानावरील “ग्लोबल बायो-इंडिया – 2023” हे भव्य आंतरराष्ट्रीय संमेलन होणार आहे. त्याच्या संकेतस्थळाचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जैव अर्थव्यवस्थेने गेल्या 9 वर्षात वार्षिक दोन अंकी विकास दर पाहिला आहे. भारत आता जगातील अव्वल 12 जैवतंत्रज्ञान ठिकाणांपैकी एक आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
“भारताची जैव अर्थव्यवस्था 2014 मध्ये फक्त 10 अब्ज डॉलर्स होती, सध्या ती 80 अब्ज डॉलर्स आहे. फक्त 8/9 वर्षात ती 8 पटींनी वाढली आहे आणि आपण 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचण्यास उत्सुक आहोत,” असे ते म्हणाले.
जैव अर्थव्यवस्था हे भविष्यात उपजीविकेचे एक मोठे फायदेशीर साधन ठरणार आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
“भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र गेल्या तीन दशकांमध्ये विकसित झाले आहे आणि आरोग्य, औषध, कृषी, उद्योग आणि जैव-माहितीशास्त्र यासह विविध क्षेत्रांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे,” असे ते म्हणाले.
भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्स महत्त्वपूर्ण आहेत असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले,
“जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्स गेल्या 8 वर्षांत 2014 मधील 52 या संख्येवरुन 100 पटीने वाढून सध्या 6,300 हून अधिक झाले आहेत. व्यवहार्य तांत्रिक उपाय प्रदान करण्याच्या आकांक्षेसह दररोज 3 जैवतंत्रज्ञान स्टार्ट-अप भारतात स्थापन होत आहेत,” असे ते म्हणाले.
जैवतंत्रज्ञान हे भविष्याचे तंत्रज्ञान आहे कारण माहिती तंत्रज्ञान आधीच त्याच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
“भारतात प्रचंड जैवसंपदा आहे. अजून वापरली गेलेली नाहीत अशी संसाधने वापराच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषत: हिमालयातील विशाल जैवविविधता आणि अद्वितीय जैव संसाधनांमुळे जैवतंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे.
आज 3,000 हून अधिक कृषी तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स आहेत. ते अरोमा मिशन आणि लॅव्हेंडर लागवडीसारख्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
जैवतंत्रज्ञान विभाग प्रगत जैवइंधन आणि ‘कचऱ्यापासून उर्जा निर्मिती’ तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला बळ देत आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
भविष्यात कचऱ्याचे प्रमाण शून्यावर येईल. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर केला जाईल,” असे त्यांनी सांगितले. पुनर्वापर तंत्रज्ञानाचा दाखला देत, वाया गेलेले स्वयंपाकाचे तेल गोळा करुन ते जैवइंधनामध्ये रूपांतरित करणारी व्हॅन डेहराडून स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने (सीएसआयआर-आयआयपी) तयार केली आहे असे त्यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “2025 पर्यंत अव्वल 5 जागतिक जैव-उत्पादन केंद्रांमध्ये भारताचा समावेश होईल”