Inauguration of computer lab and video system room in Jail Officers Training College
तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील संगणक लॅब व दूरदृष्य प्रणाली कक्षाचे उद्घाटन
दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील संगणक लॅब व दूरदृष्य प्रणाली कक्षाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेली अद्ययावत संगणक लॅब व दूरदृष्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) कक्ष प्रशिक्षणार्थीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. अंतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सुरू करण्यात आलेल्या लॅब व व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. गुप्ता बोलत होते. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वायचळ, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुकुल माधव फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त अनिल बाबी आदी उपस्थित होते.
श्री. गुप्ता म्हणाले, अद्ययावत संगणक लॅब व व्हिडिओ कॉन्फरन्स कक्ष यासारख्या अद्ययावत सोयी सुविधांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणातून चांगले अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षकही निर्माण होणे आवश्यक आहे. लवकरच या ठिकाणी प्रशिक्षणाचे वर्ग सुरू होतील. अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यावहारीक ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे व चांगले शिक्षण प्राप्त करण्याची नितांत गरज असते, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र कारागृह विभागासाठी नव्याने २ हजार पदे निर्माण करण्यात आली असून विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध होऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येत असलेला अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागून कारागृह सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती साठे म्हणाल्या, अद्ययावत सोयी सुविधांचा उपयोग करून कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण आणि शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे. नवीन तंत्रज्ञान मनापासून शिकून घ्यावे.
कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निरंतर प्रशिक्षण घ्यावे. ई-लर्निंग, ई-लायब्ररी, व्हर्च्युअल क्लासरूम, अद्ययावत संगणक लॅब आदी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुपेकर यांनी केले.
प्रास्ताविकात श्री. वायचळ यांनी महाविद्यालयात देण्यात येणारे प्रशिक्षण, तेथील सोयीसुविधा याबाबतची माहिती दिली. श्री. बाबी यांनीही मनोगत व्यक्त केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील संगणक लॅब व दूरदृष्य प्रणाली कक्षाचे उद्घाटन”