External bypass road approved under Jejuri Pilgrimage Development Plan
जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 10 कोटी 68 लाखांचा बाह्यवळण रस्ता मंजूर
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी
मुंबई : श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यासही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजूरी प्राप्त झाली असून त्यासाठी अधिकच्या 10 कोटी 68 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने जारी केला आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 17 फेब्रुवारी 2024 रोजीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करुन त्यास 11 मार्च 2024 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची आणि 13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता घेण्यात आली. त्यानुसार कालंच नवीन कामांचा व निधीमंजूरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 20 जून 2022 रोजी मंजूर करण्यात आलेल्या 109 कोटी 57 लाख रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे 10 कोटी 68 लाख रुपये मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेंनुसार प्रस्ताव सादर करुन आवश्यक मंजूरी मिळवण्यासह शासन निर्णय जाही करण्याची ही कार्यवाही अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात आली.
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहरविकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 349.45 कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामासाठी 109 कोटी 57 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यात आता 10 कोटी 68 लाख रुपये अधिकचे मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर 109 कोटी 57 लाख रुपयांच्या निधीतून, मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 23 लाख रुपये, दीपमाळांचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 25 लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायर्या, 13 कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी 12 कोटी 22 लाख रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्तीसाठी 12 कोटी 56 लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्तीसाठी 2 कोटी 2 लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्तीसाठी 10 कोटी 73 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत 12 कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी 18 लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.
प्रत्यक्षात जुलै 2023 मध्ये कामाला सुरुवात झाली. दि. 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सप्टेंबरमध्ये मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवर्या, सज्ज्यावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणामार्गावर दगडी पायऱ्या बसविणे, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणे ही कामे सुरू आहेत. पिंपळ वेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे, कमान सुशोभीकरण, बानूबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामे सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसेच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामे प्रगतिपथावर आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
One Comment on “जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बाह्यवळण रस्ता मंजूर”