Job opportunities abroad for ITI-trained students
आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी
– संचालक दिगांबर दळवी
मुंबई : भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले.
दादर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. दळवी बोलत होते. यावेळी सहसंचालक अनिल गावित, उपसंचालक रमण पाटील, श्री. निकम, श्री. कथले, प्राचार्य व्ही. जी. संखे, प्राचार्य व्ही. एन. खेवलकर, प्राचार्य श्रीमती भोर आदी उपस्थित होते.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्यातील 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासिकांचे उद्घाटन आज झाले. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेत अभ्यासिका सुरू केली आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासाबरोबर इतर परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण गरीब विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका लाभदायक आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अभ्यासिकेचा वापर व्हावा. जर्मनी, जपान या देशांमध्ये महाराष्ट्रातील 70 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. आणखी आयटीआय प्रशिक्षण घेणारे साडेतीन हजार विद्यार्थी परदेशी पाठवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याकरिता जपान, जर्मनी येथील भाषेचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचाही प्रयत्न शासन करणार आहे.
श्री. पाटील यांनी सांगितले की, अभ्यासिकेच्या माध्यमातून कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. ही अभ्यासिका संध्याकाळी सहा ते नऊ या काळात सुरू राहणार असून यासाठी स्वतंत्र कर्मचारी, सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे, असेही आवाहन करण्यात आले.
अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आभार श्रीमती भोर यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी”