Katraj-Kondhwa road work accelerated!
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती!
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार महावितरणकडून कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी ५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि भूसंपादन मोजणीच्या कामासाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याने रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.
पालकमंत्री श्री.पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह; रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच, भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने राबविण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.
वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली आहे.
वाहतूक पोलीस, महसूल आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी तीनही यंत्रणांचे अभिनंदन केले असून महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे आणि भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती!”