A unique ‘Khadi Fashion Show’ in Mumbai to attract the new generation to Khadi clothing
खादीचा प्रचार आणि नव्या पिढीला खादी वस्त्राकडे आकर्षित करण्यासाठी एनआयएफटी ने मुंबईत केला अनोखा ‘खादी फॅशन शो’
मुंबई : भारतात प्राचीन काळापासून खादी वस्त्र वापरले जात होते. भारताच्या वस्त्रोद्योगाची ओळख असलेले खादी कापड स्वातंत्र्यलढ्यात तर ब्रिटिशांविरोधात एक शस्त्र म्हणून वापरले गेले. आज जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताची उभारणी करत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करतो आहोत, अशा वेळी देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेले हे वस्त्र लोकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये अधिक लोकप्रिय व्हावे, या दृष्टीने, मुंबईतल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था- म्हणजेच एनआयएफटी इथे सहा ऑक्टोबर रोजी ‘खादी फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले होते.
फॅशन क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या मेहर कॅस्टेलीनो आणि बिर्ला सेल्युलोज डिझाईनचे प्रमुख, नेल्सन जाफरी यांच्या हस्ते या खादी फॅशन शो चे उद्घाटन झाले. या फॅशन शो साठी अनेक डिझाईनर्सनी आपले महत्वाचे योगदान दिले. खादीच्याच विविध पारंपरिक वस्त्रांना, साड्यांना आधुनिक डिझाईनचे कोंदण लावत, अत्यंत उच्च अभिरुचिसंपन्न डिझाईन्स यावेळी तयार करण्यात आले होते. ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी देखील आपल्या सर्जनशीलतेचा कल्पकतेने वापर करत, विविध वस्त्र तयार केले होते. त्यांनी तयार केलेल्या खादीच्या आधुनिक वस्त्र प्रावरणांनी ह्या फॅशन शो ची रंगत अधिकच वाढली. अनेक विद्यार्थ्यांनी क्राफ्ट बेस्ड डिझाईन्स पण तयार केले होते.
देशातल्या विविध वीणकरांची मदत घेऊन अनेक वस्त्रे तयार करण्यात आली होती. या वस्त्रांचे रेखाटन, संरचना, नियोजन आणि इतर सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच केल्या. एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार सर्व आखणी करण्यात आली. खादी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तेच ते कुर्ते आणि ठराविक प्रकारचे कपडे येतात. या साचेबद्धतेतून खादीला मुक्त करत, नव्या स्वरूपात सादर करण्याच्या उद्देशाने हा फॅशन शो भरवण्यात आला होता.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “नव्या पिढीला खादी वस्त्राकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईत अनोखा ‘खादी फॅशन शो’”