Successful launch of Exposat satellite
एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
एक्सपोसॅट उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
श्रीहरिकोटा : इस्रोने आपल्या आकाशगंगेतील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाने नवीन वर्षाची सुरुवात केली.
इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर (XPoSat) उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या उपग्रहाबरोबर इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं.
खगोलीय स्त्रोतांपासून वैश्विक क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्याचा,भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे.एक्सपोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे,आकाशगंगेतली कृष्ण विवरं आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे.
एक्सपोसॅट उपग्रहाबरोबर प्रक्षेपित करण्यात आलेल्या दहा वैज्ञानिक उपग्रहांमध्ये इस्रोच्या तीन उपग्रहांसह इतर संस्थांच्या उपग्रहांचा समावेश आहे.हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.एक्सपोसॅट अभ्यास उपग्रहाचा कालावधी पाच वर्षांचा असून,तो कक्षेत यशस्वीपणे स्थिरावल्याचं इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी सांगितलं.एक्सपोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अंतराळ राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं २०२४ या वर्षाची लक्षवेधी सुरुवात केल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
एक्सपोसॅट उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.
भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल त्यांनी अंतराळ समुदायाचे तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“वर्ष 2024 ची दमदार सुरुवात केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांना धन्यवाद! हे प्रक्षेपण अवकाश क्षेत्रासाठी एक संस्मरणीय बाब असून त्याद्वारे या क्षेत्रात भारताचे प्राबल्य वाढेल. भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि संपूर्ण अंतराळ समुदायाचे अभिनंदन.”
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण”