Work should be done to convey the thoughts and legacy of Padma Shri Sindhu and Sapkal to the next generation
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे विचार व वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे
– मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मांजरी बु. येथील सन्मती बालनिकेतन संस्थेला भेट
पुणे : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे विचार व वारशाचे संगोपन करुन पुढच्या पिढीपर्यंत पोहचवित असताना माईंची कुठेही कमतरता भासणार नाही, याकरीता सर्वांनी मिळून काम करावे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. या कामासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
मांजरी बु. येथील सन्मती बालनिकेतन संस्थेला भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय उपआयुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, संस्थेच्या अध्यक्षा ममता सपकाळ, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.
श्रीमती तटकरे म्हणाल्या, माईंनी समाजातील विविध ठिकाणी भेट देत सामाजिक कार्य केले. या संस्थेला माईंचा मोठा वारसा, सहवास लाभलेला आहे. त्यांचे विचार आत्मसात करून नव्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हे करीत असताना त्यांच्या विचारांमधून माईचे दर्शन पुढच्या पिढीला घडले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
त्या पुढे म्हणाल्या, येथील विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी, पुढे जाण्याची तळमळ आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास दिसून येत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यावरूनच त्यांच्यावर झालेले माईचे संस्कार दिसून येतात. सन्मती बालनिकेतन संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
कार्यक्रमापूर्वी श्रीमती तटकरे यांनी संस्थेची पाहणी केली. तसेच कार्यक्रमानंतर येथील विद्यार्थ्यांसोबत बसून येथील शिक्षण, पायाभूत सुविधा, आहार आदींबाबत संवाद साधला.
श्रीमती सपकाळ म्हणाल्या, माईंनी शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. त्यांचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी असून त्यादृष्टीने संस्थेची वाटचाल सुरु आहे.
खराडी येथील ऑक्सीजन पार्कची पाहणी
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी वडगाव शेरी मतदार संघाअंतर्गत खराडी येथे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन पार्कचीदेखील पाहणी केली. यावेळी आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे विचार व वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे”