सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन, अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर.

Legendary singer Lata Mangeshkar passes away at the age of 92.

Government announces two-day national mourning in memory of Bharat Ratna Lata Mangeshkar.

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.

 लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर.Lata-Mangeshkar

मुंबई: सुप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज वयाच्या 92 व्या वर्षी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारी रोजी कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भारतीय चित्रपट सृष्टीतील युगप्रवर्तक आणि सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका असा लौकिक मिळवलेल्या लता मंगेशकर यांना वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या कलेचा वारसा लाभला होता. बालवयातच त्यांनी संगीत नाटकात भूमिका केल्या.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत. लता मंगेशकर वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते, तर ‘पहिली मंगळागौर’ (1942) या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयही केला होता.

Lata Mangeshkar-Childhood
Photo: Wikipedia.org

1946 साली वसंत जोगळेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी आप की सेवा में या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी गीत गायले. लता मंगेशकर यांनी 22 भाषांमधील, 1800 पेक्षाही अधिक चित्रपटांमधून 25 ते 30 हजार गाणी गायली आहेत. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ असान त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.

सरकारने लता मंगेशकर यांना 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले, तर 2001 साली त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच त्यांना ‘लिजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा पुरस्कारही प्राप्त आहे.  सर्वोत्कृष्ठ गायिका म्हणून लता मंगेशकर यांना चार फिल्मफेर, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहे. 1984 मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार जाहीर केला, तर महाराष्ट्र शासनाने 1992 मध्ये संगीत क्षेत्रातील प्रतिभावानांना लता मंगेशकर पुरस्काराने जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्याप्रती आदर म्हणून दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.Legendary singer Lata Mangeshkar passes away at the age of 92

लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, अनुराग ठाकूर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रपती टवीट संदेशात म्हणाले,“लताजींचे निधन जगभरातील लाखो नागरिकांप्रमाणेच माझ्यासाठी हृदयद्रावक आहे. त्यांची असंख्य गीते भारताचे सार आणि सौंदर्य प्रस्तुत करतात, कैक पिढ्यांना आपल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात आढळते. भारतरत्न लताजींची कामगिरी अतुलनीय राहिल”.

लतादीदी खऱ्या संगीत रत्न होत्या, असे उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “लता दीदींकडून नेहमीच अपार स्नेह मिळाला, हा मी माझा सन्मान समजतो. त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहिल, असे पंतप्रधान शोकसंदेशात म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “संगीत जगतातील त्यांचे योगदान शब्दांपलीकडले आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे”.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. ते आपल्या शोक संदेशात म्हणाले, “लतादिदी नेहमी आपणा सर्वांसाठी प्रेरणास्थान राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या सूरांनी लोकांच्या ह्रदयावर राज्य केले. आज त्या आपल्यामध्ये नाहीत, मात्र, त्यांचा सूर अमर आहे, तो नेहमी  गुंजेल, असे पीयूष गोयल आपल्या शोकसंदेशात म्हणाले.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी लतादिदींचे निधन म्हणजे कधीही न भरुन येणारी हानी असल्याचे म्हटले आहे. त्यांचे निधन हे प्रत्येक नागरिकांसाठी वैयक्तिक नूकसान असल्याचे अनुराग ठाकूर म्हणाले.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष, गीतकार आणि कवी प्रसून जोशी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *