The creation of ‘Leopard Safari’ in Junnar taluka will boost tourism
जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनास चालना मिळेल– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
बिबट सफारीने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील
मुंबई : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन मंत्रिमंडळाच्या मान्यतेने ही सफारी सुरु करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मंत्रिमंडळ निर्णयाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर तालुक्यातील वन व निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
जुन्नर वन विभागामध्ये प्रामुख्याने जुन्नर तालुक्यात बिबट वन्यप्राण्यांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी विचारात घेऊन बिबट वन्यप्राण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी निर्मिती करण्याचा प्रस्ताव मान्य केला. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 58 हजार 5885 हेक्टर वनक्षेत्र समाविष्ट असून या वन विभागात पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यातील वन क्षेत्राचा समावेश होतो. त्यामध्ये शिरूर वगळता जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुके पश्चिम घाटाचे वनक्षेत्रात येतात.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, या चार तालुक्यांना निसर्ग व ऐतिहासिक स्थळांचा मोठा वारसा आहे. या चारही तालुक्यात पर्यटनाकरीता मोठ्या संख्येने पर्यटक विविध पर्यटन स्थळांना तसेच गड किल्ल्यांना भेटी देत असतात. जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी, अष्टविनायक गणपतीची लेण्याद्री, ओझर ही धार्मिक स्थळे आणि माळशेज घाट, नाणेघाट, किल्ले जिवधन, किल्ले चावंड ही प्रामुख्याने पर्यटकांची आवडती स्थळे आहेत. राज्य शासनानेही जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणुन घोषीत केलेला आहे. या बिबट सफारीने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पातही जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरु करण्यात येईल अशी घोषणा केली होती. बिबट सफारीच्या स्थळ निश्चितीसाठी जुन्नर वन विभागाच्या स्तरावर नेमलेल्या 09 सदस्यीय समितीने सुचविलेल्या स्थळांपैकी आंबेगव्हाण येथे बिबट सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे आंबेगव्हाण येथे दाट वनक्षेत्र असून ते नागरीकरणापासून दूर असल्याने या ठिकाणी बिबट सफारी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बिबट सफारी प्रकल्पासाठी एकूण 54 हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन या सफारी मध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले दुहेरी प्रवेशद्वार, सफारी रस्ता, रात्रीचे निवारे, संरक्षक भिंत आदी सुविधा असणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनास चालना मिळेल”