‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ क्रांती घडवतील

5th to 8th class students will become 'Cleanliness Monitors' पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

‘Swachhta Monitors’ will revolutionize the ‘Let’s Change’ initiative

‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ क्रांती घडवतील

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘लेट्स चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ म्हणजेच बदल घडवूया उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता मॉनिटर्स बनलेले विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.5th to 8th class students will become 'Cleanliness Monitors' पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत लेट्स चेंज उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स बनविले आहे. याचा शुभारंभ आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, लेट्स चेंज उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह स्वच्छता मॉनिटर विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, निश्चय केला की बदल घडतोच. त्यातही लहान मुले सांगतात ते मोठ्यांना ऐकावेच लागते. स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून लेट्स चेंज या उपक्रमात ६४ हजार शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी सहभागी होत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यातील या उपक्रमामुळे आणि त्यात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगून शाळा मान्यतेसाठी आता फेऱ्या माराव्या लागत नाहीत, ते प्रस्ताव आता तातडीने मंजूर होत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले. राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचे लाभ एकाच छताखाली दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांतील घाण केले जाणारे कोपरे, उड्डाणपुलांखालील जागा स्वच्छ करून तेथे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना दिल्या असून काँक्रीटच्या खड्डेमुक्त रस्त्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. हे प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा आणि स्वच्छतेचा देखील विचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी समाजाला बदलण्याची किमया करू शकतात – दीपक केसरकर

स्वच्छतेची चळवळ देशभर सुरू असून राज्यात स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाला बदलण्याची किमया करू शकतात, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय जोपासावी, खेळ खेळावेत, असे आवाहन त्यांनी केले. भारत हा तरूणांचा देश असून जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची आपल्याकडे क्षमता आहे, यासाठी व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश, टेरेस गार्डन, ग्रंथालयांमध्ये वाढ, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने आदी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महाराष्ट्र स्वच्छतेतही देशात पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाची माहिती दिली. तर, राघवी पालांडे, श्रेया पवार, प्रदिप्ता घोष आदी स्वच्छता मॉनिटर्स विद्यार्थ्यांनी मनोगताद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपक्रमाविषयी

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनणार असून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देणार आहेत. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत असून राज्यातील सुमारे 64 हजारांहून अधिक शाळांची आणि 38 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकडून साफ सफाई करून घेणे अपेक्षित नाही. तर, विद्यार्थी ‘स्वच्छता मॉनिटर’ होण्याची जबाबदारी घेतील. कुठेही निष्काळजीपणे कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसले, तिथे त्या व्यक्तीला थांबवून चूक दाखवून ती सुधारायला सांगतील. नंतर ह्या घटनेचे छोटे मजेशीर विवरण देतानाचे व्ह‍िडिओ सोशल मीडियावर शेअर करतील. ह्या अभियानात निवडलेल्या विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर’ ओळखपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच येत्या 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या दिवशी सर्वोत्तम पाच जिल्हे, 100 शाळा आणि 300 विद्यार्थ्यांना मुंबई येथे समारंभपूर्वक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा व्हावा
Spread the love

One Comment on “‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ क्रांती घडवतील”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *