Central Government’s work to transform the lives of rural citizens
ग्रामीण नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा
विकसित भारत संकल्प यात्रेचे विडणी येथे आयोजन
सातारा : विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी फलटण तालुक्यातील विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमप्रसंगी केले.
याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. मिश्रा यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
केंद्र शासनातर्फे अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. मिश्रा म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यात आली. शौचालय नसलेल्यांना बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळ जोडणीच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे काम देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा ही देशातील प्रत्येक ग्रामीण भागात जात आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच विविध योजनांचा लाभ देणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असून यात्रा जात असलेल्या प्रत्येक गावात अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लाभ दिला जात आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. मिश्रा यांनी यावेळी केले.
खासदार श्री. नाईक निंबाळकर म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. कोविड काळात मोफत अन्नधान्य, सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या प्रभावीपणे राबविल्या जात असलेल्या योजनांमुळे आज देशाबरोबर ग्रामीण भागाचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे यावेळी सांगितले.
यात्रेमध्ये पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, बचत गटांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनांच्या लाभासह माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.
यावेळी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ग्रामीण नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम”