A one-window facility for licensing in the wake of the upcoming Lok Sabha General Elections
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी एक खिडकी सुविधा
पुणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी देण्यात येणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार असून निवडणूक विषयक विविध परवानग्यांसाठी संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि नोंदणीकृत पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात तसेच उमेदवार किंवा प्रतिनिधींनी लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षात अर्ज करावा.
उमेदवार किंवा प्रतिनिधींनी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा. अर्जासोबत परिवहन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहनाचे आर.सी. पुस्तक, वाहनाचा विमा, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, कर भरल्याची पावती, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयूसी, वाहनाच्या चारही बाजूचे छायाचित्र जोडावे.
विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात तात्पुरते पक्ष कार्यालय उघडण्याबाबत लागणाऱ्या परवान्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तसेच कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, ध्वनीक्षेपण परवान्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.
विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात फेरी, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्याचे आयोजन, ध्वनीक्षेपणाबाबत परवाना मिळण्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलीस अधिकारी तर लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील परवान्याकरीता जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अर्जासोबत पोलीस विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.
विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात स्टेज, बॅरिकेट आणि भाषणाकरीता उंच व्यासपीठ (रोस्ट्रम) उभारण्याबाबत लागणाऱ्या परवान्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापत्य व विद्युत शाखा आणि अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.
जिल्ह्यात हेलीपॅडचे बांधकाम आणि हेलिकॉप्टर उतरविण्याबाबत लागणाऱ्या परवान्याकरीता ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखा , पुणे शहर हद्दीसाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड हद्दीकरीता पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापत्य व विद्युत शाखा आणि अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी ३ एप्रिल रोजी होणार
One Comment on “आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी एक खिडकी सुविधा”