Maharashtra Bhushan Award 2023 to veteran Marathi actor Ashok Saraf
ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन
अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा सुपरस्टार अभिनेत्याचा, राज्याच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव
— उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कला क्षेत्रातील कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन 1995 पासून सुरुवात झाली.
यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य –चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी अनेक चित्रपटातून रसिकांना खळखळून हसायला लावले. त्याचबरोबर, संवेदनशीलतेने भूमिका साकारताना रसिकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अभिनयाचे गारुड मराठी चित्रपटरसिकांवर आजही कायम आहे.
मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे
मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या पाच दशकांपेक्षा जास्त काळ अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांमधून आपल्या सशक्त अभिनयानं रसिकांचं मनोरंजन केलं आहे. हमीदाबाईची कोठी, अनधिकृत, ते सारखं छातीत दुखतय, व्हॅक्यूम क्लीनर अशा नाटकांमधून त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली.
मराठी चित्रपटांमधे पांडू हवालदार, अरे संसार संसार, एक डाव भूताचा, एक उनाड दिवस, वजीर, सुशीला, चौकट राजा, गुपचुप गुपचुप, भस्म, बहुरूपी, निशाणी डावा अंगठा अशा अनेक चित्रपटांमधे त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या.
हिंदीमधे दामाद, जोरु का गुलाम, करण-अर्जून, कोयला, सिंघम इत्यादी चित्रपटांमधे त्यांनी काम केलं. हिंदीतल्या हम पांच, छोटी बडी बाते, डोन्ट वरी होजायेगा, तसंच मराठीतल्या टनटनाटन, नाना ओ नाना या त्यांच्या मालिका गाजल्या. या तिन्ही माध्यमांमधे त्यांनी अभिनयासाठी पुरस्कार मिळवला आहे.
अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा सुपरस्टार अभिनेत्याचा, राज्याच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
“ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हससवलं. मराठीसह हिन्दी कलाक्षेत्रं समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं.
वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वांवर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ. अनिल काकोडकर, वासुदेव कामत, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. शशिकला वंजारी, अॅड. उज्वल निकम आणि समितीचे सदस्य सचिव बिभीषण चवरे यांचा समावेश होता.
राज्य शासनाने प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून त्यांच्या साहित्य सेवेतील योगदानाबद्दल गौरविले होते. त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर (संगीत), ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर (क्रीडा), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर (विज्ञान), क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर (क्रीडा), पंडीत भीमसेन जोशी (कला/संगीत), सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व राणी बंग (सामाजिक प्रबोधन), ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे (सामाजिक प्रबोधन), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), उद्योगपती रतन टाटा (उद्योग), रा. कृ. पाटील (समाजरप्रबोधन), कवीवर्य मंगेश पाडगावकर (साहित्य), नानासाहेब धर्माधिकारी (समाजप्रबोधन), ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (मराठी चित्रपट), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (विज्ञान), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान), शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (साहित्य), ज्येष्ठ गायिका आशा भोसले (संगीत) आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (समाजप्रबोधन) यांना राज्य शासनाने यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार”