‘Maharashtra Chatushtay’ program at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘महाराष्ट्र चतुष्टय’ कार्यक्रम
डॉ.सदानंद मोरे यांची प्रकट मुलखत व चर्चासत्राचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर अध्यासन, संत तुकाराम अध्यासन व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विचारवंत व महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे व्यासंगी संशोधक-अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
जून २०२२ मध्ये मोरे वयाच्या एक्काहत्तरीत प्रवेश करणार आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्राविषयीच्या त्यांच्या संशोधकीय मांडणी व साहित्यावर विविधांगी चर्चा व्हावी या उद्देशाने ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि आगामी ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या त्यांच्या चार ग्रंथांवर ‘महाराष्ट्र चतुष्टय’ हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
दि. २४, २५ व २६ मार्च २०२२ रोजी पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात हे चर्चासत्र होईल. दि. २४ मार्च रोजी प्रा.अभय टिळक, डॉ.प्रभाकर देसाई, डॉ.रूपाली शिंदे व श्री.सचिन परब प्राध्यापक मोरे यांची मुलाखत घेतील.
दि. २५ मार्च रोजी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर यांच्या हस्ते व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ.राजा दीक्षित चर्चासत्राचे बीजभाषण करतील. तर डॉ.दिलीप धोंडगे, प्रा.अभय टिळक, डॉ.अशोक चौसाळकर, डॉ.अभय दातार, श्री.किशोर बेडकिहाळ, प्रा.सुरेंद्र दरेकर, डॉ.उमेश बगाडे, डॉ.रणधीर शिंदे असे राज्यभरातील ज्येष्ठ अभ्यासक मोरे यांच्या ग्रंथांचे महत्त्वमापन करतील.
डॉ.रमेश वरखेडे चर्चासत्रात झालेल्या चर्चेचा समारोप करणार असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस.एन.उमराणी यांच्या अध्यक्षतेखाली २६ मार्च रोजी चर्चासत्राचा समारोप होईल.
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘महाराष्ट्र चतुष्टय’ कार्यक्रम”