Maharashtra NCC Directorate first in the country; Awarded to the winner of the ‘Prime Ministerial Banner’
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान
सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला
नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2023-24 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास (122 कॅडेट चा सहभाग), मेजर जनरल योगेंद्र सिंग आणि नेवल कॅडेट सृष्टी मोरे यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारला व एअर कॅडेट प्रितीलता झा यांनी ट्रॉफी स्वीकारली.
महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते, नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह सर्व कॅडट उपस्थित होते. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 27 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर कर्नाटक आणि गोवा एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान विभागून प्रदान करण्यात आला. यावेळी, नागपूरच्या रिमाउंट व वेटेरिनरी स्काड्रन कॅडेट ने सर्वोत्कृष्ट टेंट पेगर ट्रॉफी जिंकली. महाराष्ट्र संचालनालय यांनी सलग तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे.
महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग तीसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर
महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १९ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. राज्याने मुसंडी घेत मागील दोन वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल आठ वर्षाने सलग तीन वर्ष प्रधानमंत्रीबॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.
महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, प्रधानमंत्र्याच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये तुकडीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा मान मिळाला. 27 जानेवारी रोजी करिअप्पा संचलन मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाला प्रधानमंत्री ध्वज निळाला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम”