Grand Inauguration of Mahasanskrit Mahotsav 2024
महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन
‘वारसा संस्कृतीचा’ कार्यक्रमाने ग्रामीण संस्कृती उभी करत आणली बहार
पुणे : ‘रामाच्या पारी घरी येणारा ग्रामीण संस्कृतीतील वासुदेव’, ‘भलगरी दादा भलगरी म्हणत बैलजोडीसह पेरणीला, लावणीला निघालेला शेतकरी दादा’, पश्चिम महाराष्ट्रातील डोक्यावर समई ठेवून नृत्याची ‘दिवली’ कला, विठुरायाच्या भक्तीरसात नाहून निघालेले अभंग आणि वारी आदी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत वारसा संस्कृतीचा कार्यक्रमाने महासंस्कृती महोत्सवात बहार आणली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. मोरे म्हणाले, स्थानिक कलाकारांच्या कलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कर्तुत्वाची मांडणी सादर करणारे कार्यक्रम आयोजित करणे, लुप्त होणाऱ्या कलांना प्रोत्साहन मिळावे, त्या जीवंत रहाव्यात व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागील आहे.
ते पुढे म्हणाले, आपली संस्कृती आपण कशी जोपासतो आणि पुढच्या पिढीला कशी हस्तांतरित करतो याला महत्व आहे. म्हणूनच पुणे जिल्ह्यात येरवडा, बारामती आणि सासवड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात १५ वर्षापासून कथ्थक शिकत असलेल्या केंद्र शासनाकडून शिष्यवृत्ती मिळविलेल्या कथ्थक नृत्यांगना अलापिनी अमोल यांनी सादर केलेल्या आकर्षक गणेश वंदनेने झाली.
अमित भारत यांच्या संकल्पनेतून ‘वारसा संस्कृती’चा या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच पुरातत्व विभागाकडून जतनकार्य असलेल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, महिला स्वयंसहायता बचत गटांचे विविध हस्तकला, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
रसिकांना ३ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी
या महोत्सवात ३ मार्चपर्यंत अभंग, भजन, कीर्तन, नाटक, बालनाट्य, एकांकिका आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा येथे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते संय. ५ वा. भजनी मंडळ स्पर्धा व त्यानंतर रात्री ८ ते ११ वा. राहुल देशपांडे यांचे अभंग गायन होणार आहे. बारामती विद्यानगरी येथील गदिमा सभागृहात रात्री ८ ते ११ या वेळेत ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटक आणि आचार्य अत्रे नाट्यगृह सासवड येथे सायं. ४ ते ७ वा. नेकी, मजार, बी अ मॅन या एकांकिका, रात्री ८ ते ११ या वेळेत सोबतीचा करार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात
One Comment on “महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन”