Mahavikas Aghadi is needed to stop BJP- Jitendra Awhad.
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे- जितेंद्र आव्हाड.
ठाणे : आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप असून त्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची असल्याचं मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय अवलोकन करण्यात आलं. एकमतानं महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरविण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवं, असं काही नाही,असं आव्हाड म्हणाले.
शिवसेनेशी चर्चा करणार का, यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते सकारात्मक भूमिका घेत असल्याचं दिसून आल्यानंच आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आघाडीमध्ये मतभेद असतात. पण, ते बाजूला सारुन कॉमन मिनिमम प्रोग्राम करुन पुढे जावंच लागतं. चर्चेला बसल्यावर अजेंडा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकांना साह्य करीत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसं संजय राऊत यांच्या बाजूनं सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याच धर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्याची इच्छा आहे. कार्यकर्त्याचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे आम्ही आघाडीच्या बाजूनं आहोत. आमच्याकडून सुरवातीपासून केव्हा टीका केली गेली नव्हती. परंतु समोरुन जर टीका होत असेल तर त्याला प्रतिउत्तर हे द्यावंच लागतं. त्यामुळे सर्वानी सांभाळून बोलावं., आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांना सामंजस्याची भुमिका घ्यायला हवी अशा प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.