Khelega India… Tabhi To Badhega India
खेलेगा इंडिया.. तभी तो बढ़ेगा इंडिया-निमंत्रित जिल्हास्तरीय मल्लखांब चषक 2022 स्पर्धा
पुणे : शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी ही भारतीय खेळ, कला आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी सामाजिक संस्था आहे. संस्था खेळाबरोबरच शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातही आपले काम करत आहे. मुलांमध्ये भारतीय खेळ आणि व्यायाम यांची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्था विशेष प्रयत्न करते. भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी, आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चंद्रकांतदादा पाटील निमंत्रित जिल्हास्तरीय मल्लखांब चषक 2022 या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर होणार आहेत.
दि. 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या स्पर्धांमध्ये 22 संस्थांनी सहभाग नोंदवला असून अंदाजे 450 खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत. सदर स्पर्धा 10, 12 आणि 14 वर्षाखालील मुले-मुली, 16 वर्षाखालील आणि 16 वर्षांवरील मुली, 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील मुले या वयोगटामध्ये होणार आहेत. तसेच मल्लखांब या भारतीय खेळाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी “मल्लखांब फॉर ऑल” या विशेष प्रकारामध्ये वय वर्षे 30 पासून ते 80 वर्षांच्या प्रशिक्षक, खेळाडूंनीही सहभाग नोंदवला आहे.
वरिष्ठ गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 वर्षांवरील पुरुष व महिला असे वयोगट असणार आहेत. यामध्ये 1972 साली झालेल्या पहिल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले श्री. अरुण कागदे, पुणे जिल्हा मल्लखांब संघटना संस्थापक सदस्य भास्कर गोडबोले, राष्ट्रीय पदक विजेते डॉ. आदित्य केळकर, योगेश येवले, एशियन मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर सर इ. दिग्गज मान्यवर खेळाडू आपली प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना दोन लाखांची रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन दिवस सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मल्लखांबातील प्रथम महिला अर्जुन पुरस्कार विजेत्या हिमानी परब आणि कबड्डीच्या प्रथम महिला अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर यांच्या शुभहस्ते आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.
तसेच या स्पर्धेचे औचित्य साधून पुण्यातील मल्लखांब खेळातील शिवछत्रपती विजेत्या खेळाडूंचाही सन्मान यानिमित्ताने करण्यात येणार आहे.