A musical tribute to Master Krishnarao Phulmbrikar on his birth centenary
मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगीतिक मानवंदना
संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा सांगीतिक जीवनप्रवास सांस्कृतिक कार्यक्रमातून उलगडणार
पुणे : कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने भरत नाट्य संशोधन मंदिर येथे गुरुवार १४ मार्च रोजी सायंकाळी ५. ३० वाजता महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा सांगीतिक जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीत नाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते पट्टशिष्य होते. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, चित्रपट संगीत आणि भाव संगीतावर आधारित गायन तसेच संवादात्मक अशा सांस्कृतिक कार्यक्रमात पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, हृषिकेश बडवे, अनुराधा मराठे, शिल्पा दातार हे गायनाद्वारे मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांना अभिवादन करतील. प्रा. डॉ. नरेंद्र चिपळूणकर (संगीत संयोजन आणि संवादिनी), पांडुरंग मुखडे, प्रशांत पांडव (तबला), हिमांशू जोशी (ऑर्गन), संतोष मोरे (साईड ऱ्हिदम), मुकुंद कोंडेकर (पखवाज) यांची साथसंगत असणार आहे.
प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी हे निवेदकाच्या भूमिकेत आहेत. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची नात प्रिया फुलंब्रीकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे समन्वय भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे करत असून आदिती बोरकर यांचे सहाय्य लाभले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असून या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी भरभरुन आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा
One Comment on “मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगीतिक मानवंदना”