MP Supriya Sule will focus on issues of the Brahmin community
ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांमध्ये प्राधान्याने लक्ष घालणार – खासदार सुप्रिया सुळे
पुणे : ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे या प्रमुख मागणीसाठी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले, ज्यास सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व प्रश्नांसाठी मी लक्ष घालणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
सर्वश्री गोविंद कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, भालचंद्र कुलकर्णी, मंदार रेडे, विजय शेकदार, वृशाली शेकदार, दिलीप कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे, राहुल करमरकर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका अशा विविध ब्राह्मण संस्था संघटनांच्या पदाधिकार्यां नी यावेळी खासदार सुळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पर्वती विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष विपुल म्हैसकर सोबत होते.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान सारख्या राज्यांनी ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील करावे. ब्राह्मण समाजाचा मोठा वर्ग हा पौरोहित्य करतो आणि सध्या पुरोहित मोठ्या प्रमाणावर उपासमारीने जीवन जगत आहेत, यासाठी पुरोहितांना दरमहा किमान ५ हजार रुपये मानधन सुरू करण्यात यावे. तसेच आर्थिक दुर्बल असलेले अल्पभूधारक ब्राह्मण शेतकरी यांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच ज्या इनामी जमिनी ब्राह्मण व्यक्तींना मिळालेल्या आहेत त्यांची नोंद वर्ग २ वरुन वर्ग १ करण्याची आग्रही मागणी आहे, ज्यामुळे त्या जमिनींच्या मालकी हक्काच्या नोंदी होऊ शकतील.
ब्राह्मण समाजावर होणारी टिंगल टवाळी रोखण्यासाठी तसेच राष्ट्रपुरुषांची समाज माध्यमांवर होणारी बदनामी रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याची गरज असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. यापूर्वी देखील या मागण्यांसाठी आंदोलने झाली, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही. खासदार सुळेंनी पुढील १५ दिवसात या मागण्यांचे अधिक तपशील घेवून ब्राह्मण शिष्टमंडळाला घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा घडवून आणणार असल्याचे देखील यावेळी आश्वासन दिले.