Honoring Mumbaikars is a matter of pride
मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ अंतर्गत गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मुंबई वॉक’ कार्यक्रम
मुंबई : मुंबई शहराच्या सर्व अद्वितीय गुणांचं दर्शन ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या निमित्ताने घडेल. मुंबईकरांमध्ये जगण्याचे ‘स्पिरीट’ निर्माण करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचा होणारा सत्कार सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित केला आहे आहे. या महोत्सवामध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मुंबई वॉक’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यटन सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील हे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई काळासोबत धावणारे शहर आहे. प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे कोळीवाडे, ऐतिहासिक किल्ले, जुनी चाळसंस्कृती, ब्रिटिशकालीन इमारतींचे वास्तूवैभव, सर्वांची स्वप्ने पूर्ण करणारे, जीवाला जीव देणाऱ्यांचे हे शहर आहे. मुंबईच्या हवेत संकटांशी लढण्याचे सामर्थ्य आहे. मुंबईकरांमध्ये जगण्याचं ‘स्पिरीट’ आहे. सर्वसामान्य नागरिक, माथाडी कामगार, डब्बेवाले, उद्योजक ते सिने तारे – तारका असे सर्वांचे शहर आहे.
मुंबई पोलीस आयुक्त श्री. फणसळकर म्हणाले की, पोलिस दल २४ तास सेवेत असते. जबाबदारी सोबतच हे काम करणे म्हणजे भाग्याचे आहे.
‘मुंबई वॉक’ हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईची गती कायम ठेवणारे खरे हिरो डबेवाला, पोलिस हवालदार, बेस्ट बस चालक आणि वाहक तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. गायक अवधुत गुप्ते, अमृता फडणवीस यांचा संगीताचा कार्यक्रम पार पडला.
इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीज चे प्रमोशन अभिनेता विवेक ओबेरॉय, सिद्धार्थ मल्होत्रा,अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला अभिनेता समीर कोचर, पर्यटन विभागाच्या सदिच्छा दूत नवेली देशमुख, अभिनेता चंकी पांडे, कबीर बेदी, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते पंकज त्रिपाठी, सुप्रसिद्ध शेफ संजीव कुमार या सर्वांनी ‘मुंबई वॉक’ मध्ये सहभाग घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com