Namo Maharojgar Mela on March 2 at Baramati
बारामती येथे २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा
मेळाव्यात अंदाजे २५० उद्योजक सहभागी होणार
मेळाव्याचे नियोजन उत्तमरितीने करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : सुशिक्षित बेरोजगारांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने बारामती येथे २ मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याचे नियोजन उत्तमरितीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय उपआयुक्त अनुपमा पवार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे उपसंचालक आर. बी. भावसार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव, विविध यंत्रणाचे अधिकारी, उद्योगसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नियोक्ता, बँकिंग लॉजीस्टिक, सेल्स मार्केटिंग, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य सेवा, पुरवठा साखळी उत्पादन, अभियांत्रिकी क्षेत्र, महाविद्यालय, कृषी उत्पादन, स्मार्ट प्रकल्प, शेती उद्योजक, कौशल्य व नाविन्यता विभाग, महिला उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना आमंत्रित करावे. स्वयंरोजगारांच्यादृष्टिनेही मॅग्नेट, कृषी उत्पादन, स्मार्ट प्रकल्प यांसारख्या विभागांचा समावेश करावा.
नमो महारोजगार मेळाव्याचे व्यापक स्वरुप लक्षात घेता नगरपरिषदेने स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरवासिताच्या माध्यमातून स्वयंस्फुर्तीने काम करण्यासाठी निवड करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय कार्यालय बारामती आणि नगरपरिषद यांनी समन्वयाने काम करून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात.
मेळाव्याकरीता बंदिस्त दालन, स्टॉल्स उभारणे, पिण्याचे पाणी, आवश्यक साहित्य सामग्री, कार्यक्रम स्थळी स्वच्छता, पाणी, वीज, शौचालय, वाहनतळ आणि वाहतुक व्यवस्था, अल्पोहार, खानपान, सुशोभीकरण, बैठक व्यवस्था, अंतर्गत रस्ते, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांचे चांगले नियोजन करावे. जिल्ह्यात २० ते ३० वयोगटातील खुप कमी मतदार आहेत. या मेळाव्यात मतदान नोंदणीबाबत जनजागृती करावी.
मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवार हजर राहण्याच्यादृष्टिने शेजारच्या शहरात प्रसिद्धी करण्यासोबत समाज माध्यमाद्वारे मेळाव्याची प्रसिद्धी करावी. महाविद्यालयातील रोजगार कक्षाशी संपर्क करून त्यांनाही मेळाव्यात समावून घ्यावे. किमान ५० माहिती तंत्रज्ञान कंपन्याना या मेळाव्यात निमंत्रित करावे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करण्यासोबत वैयक्तिक संपर्क करावा, असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले.
यावेळी श्री. जाधव यांनी नमो महारोजगार मेळाव्यात अंदाजे २५० उद्योजक सहभागी होणार असून विविध स्टार्टअप, विविध स्वयंरोजगार महामंडळे, प्रशिक्षण संस्था, सेक्टर स्कील कौन्सिल तसेच विविध शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे असे सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “बारामती येथे २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा”