An appeal to take advantage of the grand ‘Namo Maharojgar Mela’
भव्य ‘नमो महारोजगार मेळाव्या’चा लाभ घेण्याचे आवाहन
५५ हजार ७२ रिक्तपदे अधिसूचित
बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’करीता आजपर्यंत ५५ हजार ७२ रिक्तपदे कळविण्यात आली असून नावनोंदणी केलेल्या तसेच नोंदणी करावयाचे राहून गेलेल्या नोकरीइच्छुक अन्य उमेदवारांनीही थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरिता आजपर्यंत ३४७ आस्थापना सहभागी झाल्या असून त्यांच्याकडून ५५ हजार ७२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत; तर आतापर्यंत ३३ हजारावर युवक-युवतींनी रोजगारासाठी नावनोंदणी केली आहे.
मेळाव्यादरम्यान उपस्थित कंपन्यांमार्फत रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी आदी पदवीप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. तथापि, शिक्षण पूर्ण झालेल्याच नव्हे तर आय.टी.आय.च्या शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांनाही कंपन्या शिकाऊ योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनीही मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा मेळावा ३ मार्च रोजीही असल्याने अद्याप नोंदणी न केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करुन मेळाव्यासाठी उपस्थित रहावे. तसेच मेळाव्याच्या ठिकाणीही ऑफलाईन नोंदणीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर ‘सॉफ्ट स्किल्स’ चे प्रशिक्षण
‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी आप्पासाहेब सभागृह शारदानगर येथे नोकरी विषयक (सॉफ्ट स्किल्स) कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. आदिती काळे, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र पुणे येथील प्रमुख श्रुती जोशी, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे शिक्षण संचालक निलेश नलावडे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. काळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्र, रेझुमे बनविणे आदी प्रशिक्षण दिले. अभिरूप मुलाखत घेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले. यावेळी सुमारे २ हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.
ऐश्वर्या पोळ, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट बारामती: आम्ही आज पर्यंत फक्त व्यक्तिमत्व विकास, करियर याविषयी ऐकले होते. पण आज प्रत्यक्ष मुलाखत कशी द्यायची, त्यात कोणत्या बाबींचा समावेश करावा, आपली देहबोली, वर्तणूक, लोकांशी कसा संवाद साधायचा, मानसिक तसेच शारीरिक आरोग्य जपणे, मुलाखत आदींविषयी चांगले मार्गदर्शन मिळाले. त्याचा आम्हाला रोजगार मिळण्यात तसेच पुढील आयुष्यात कायम लाभ होणार आहे.
पायल संजय करंदीकर, पीजी एमबीए विद्यार्थीनी: मुलाखतीला जाताना कशी तयारी करुन जायचे. व्यावसायिक संबंध व्यवस्थापन कसे करायचे याचे चांगले प्रशिक्षण या सॉफ्ट स्किल विकास प्रशिक्षणातून मिळाले. उद्या येणाऱ्या मेळाव्यात येणाऱ्या कंपन्यांशी नेटवर्किंग कसे करता येईल आणि भविष्यात आपल्या रोजगाराच्या संधी अधिक विस्तारण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ होईल.
प्रियांका दत्तात्रय कांबळे, स्कूल ऑफ रिसर्च सेंटर ऑफ फार्मसी, एडीटी, बारामती: मोठ्या प्रमाणात शालेय शिक्षणात जास्तीत जास्त गुण मिळणाऱ्या युवांनाही चांगले व्यक्तिमत्व विकसित न करता आल्यामुळे रोजगार मिळविण्यात अडचण होते. आज मिळालेल्या सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचा उपयोग आपले ज्ञान सादरीकरणाच्या चांगल्या पद्धतीद्वारे इतरांसमोर कसे मांडता येऊ शकते यासाठी होणार ज्याचा आम्हाला भविष्यात लाभ होणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता; शासन निर्णय निर्गमित