Seminar on National Education Policy and Indian Knowledge Tradition concluded
राष्ट्रीय शिक्षा नीति आणि भारतीय ज्ञान परंपरा यावरील चर्चासत्र संपन्न
पुणे – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट, २०२३ रोजी, संस्थेच्या नवलमल फिरोदिया प्रेक्षागृहात सकाळी ९:३० ते ४:०० या वेळेत ‘राष्ट्रीय शिक्षा नीति – २०२० (NEP) आणि भारतीय ज्ञान परंपरा (IKS)’ या विषयावर एक-दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रथम श्री सुधीर वैशंपायन, सचिव, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांनी सर्वांचे स्वागत करत, आपल्या भाषणात या चर्चासत्राचा उद्देश, यातून आपण काय घेऊ शकतो, आणि राष्ट्रीय शिक्षा नीति व भारतीय ज्ञान परंपरा यांची शिक्षाप्रणाली व कार्यप्रणाली यांची तोंडओळख करून दिली.
या चर्चासत्राचा उद्देश राष्ट्रीय शिक्षा नीति – २०२० चे प्रारूप, त्यातील बदल, या बदलांची आणि प्रारूपाची अंमलबजावणी, त्यातील विषय अशा महत्त्वाच्या घटकांवर उपस्थितांचे उद्बोधन करणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री माननीय महोदया श्रीमती अन्नपूर्णादेवी यादव, राज्यमंत्री, शिक्षा मंत्रालय यांनी चर्चासत्रासाठी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. भांडारकर संस्थेचे ट्रस्टी श्री प्रदीप रावत यांच्या भाषणाने चर्चासत्राचे औपचारिक उद्घाटन झाले. त्यांच्या व्याख्यानात श्री रावत यांनी या चर्चासत्रातून भारतीय ज्ञान परंपरा हा विषय विद्यार्थ्यांसमोर घेऊन जाण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं, त्यासाठी काय प्रकारचे अभ्यासक्रम, कोणत्या प्रकारच्या कार्यप्रणाली विकसित करायला हवी, याची माहिती आपण या चर्चासत्रातून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चासत्राचे बीजभाषण प्रा. डॉ. बी. महादेवन, प्राध्यापक, आय आय एम, बेंगळूरू यांनी केले. या व्याख्यानात त्यांनी मुळात भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय? आणि या ज्ञान परंपरा आणखीन विकसित होणे किती आवश्यक आहे? त्यात अधिक संशोधन होणे आणि या वैज्ञानिक संशोधनातून त्याचा अभ्यासक्रम निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या संपूर्ण उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन भांडारकर संस्थेच्या हस्तलिखित विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनंद बापट यांनी केले.
यानंतर, प्रा. डॉ. प्रदीप आपटे, प्रा. डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रा. डॉ. भाग्यश्री यारगोप, श्री. भूपाल पटवर्धन (अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, भांडारकर संस्था) यांची व्याख्याने माहितीपूर्ण व्याख्याने झाली.
या व्याख्यानांतून नव्या राष्ट्रीय शिक्षा नीति – २०२० अनुसार, भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय, त्यातील विषय-उपविषय, या विस्तृत विषयातील कोणकोणते घटक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, ते उपयोजित आणि कालसापेक्ष स्वरुपात कशाप्रकारे पोहोचवावे, त्यासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी, क्रेडीट प्रारूप व यामध्ये महाविद्यालये, विद्यापीठे, संलग्न विभाग यांची भूमिका या विषयांवरही विस्तारपूर्ण विवेचन केले गेले. तसेच, भारतीय ज्ञान परंपराविषयक ऑनलाईन स्वरूपातील अभ्यासक्रम, त्यांचे क्रेडीट स्वरूप अशा विषयांवर सर्व सहभागींना माहिती देण्यात आली. सोबतच, भांडारकर संस्थेने विकसित केलेला bharatvidya.in या अभ्यासक्रम प्लॅटफॉर्मची सखोल माहिती सर्व सहभागी प्राध्यापकांना देण्यात आली.
समारोपाचे भाषण प्रा. डॉ. नितीन करमाळकर (भूतपूर्व कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी मुळात शिक्षकांनी, प्राध्यापकांनी अभ्यास करणे कसे आवश्यक आहे, आणि या अभ्यासातूनच आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांशी निगडीत भारतीय ज्ञान परंपरेतून काय देता येईल, याचा साकल्याने विचार करून, भांडारकर संस्थेसारख्या संशोधन संस्थांची मदत घेऊन अभ्यासक्रम निर्माण करण्याचे आवाहन सर्वांना केले.
या चर्चासत्रासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, समन्वयक, तसेच विद्यापीठांतील विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि इतर अध्यापक व समन्वयक उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com