Call for Public Participation in ‘Nav Bharat Literacy Programme’
‘नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी लोकसहभागाचे आवाहन
निरक्षर आणि स्वयंसेवकांनी नोंदणी करावी – शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर
पुणे : देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी शासन, प्रशासनाच्या प्रयत्नांना सर्व समाजघटकांनी साथ द्यावी; त्या अंतर्गत ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’त निरक्षर आणि स्वयंसेवकांनी लगतच्या शाळेकडे नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
चालू वर्षी ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनापासून राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. परंतु विविध कारणामुळे त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या कार्यक्रमात आघाडी घेणे महाराष्ट्राला शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रवासियांना शिक्षण विभागाने भावनिक आवाहन केले आहे. ही लोकचळवळ उभारुन राज्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार २०३० पर्यंत १०० टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट प्राप्त करावयाचे आहे. महाराष्ट्रामध्ये १५ व त्या वरील वयोगटातील १ कोटी ६३ लाख निरक्षर व्यक्ती असल्याचे सन २०११ च्या जनगणनेतून निदर्शनास आले आहे.
केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने नव भारत साक्षरता कार्यक्रम एप्रिल २०२२ पासून सुरू केला आहे. यासाठी ‘उल्लास’ ॲपची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती व सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यासाठी मागील व चालू वर्षांचे एकत्रित १२ लक्ष ४० हजार उद्दिष्ट आहे.
राज्यातील नागरिकांनी कुटुंबातील असाक्षरांची नोंदणी लगतच्या शाळेकडे करावी. समाजातील शिक्षित असलेल्या घटकांपैकी जे वेळ देऊ शकतात, अशांनी लगतच्या शाळेकडे स्वयंस्फूर्तीने विनामोबदला काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी. असाक्षरांना शिक्षित सदस्यांनी साक्षर करण्याचा संकल्प करावा. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षित घटकांनी सहभाग द्यावा.
डॉ.महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय
या कार्यक्रमासाठी उद्दिष्टांनुसार निरक्षर स्वयंसेवकांची नोंदणी झालेली नाही, तसेच अध्ययन-अध्यापन वर्गही अल्पप्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास अधिकाधिक निरक्षर नागरिक या अभियानाद्वारे साक्षर होऊ शकतात.
स्वातंत्र्यानंतर देशामध्ये एकूण ९ साक्षरता मोहिमा राबविण्यात आल्या. भारतात २ ऑक्टोबर १९७८ रोजी केंद्र शासनाने राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम घोषित केला आणि त्याची अंमलबजावणी सन १९७९ पासून सुरू झाली. पुढे सन २०११ च्या जनगणनेनुसार देशात प्रौढ निरक्षरांची संख्या २५ कोटी ७८ लाख होती. आजही देशात १८ कोटी निरक्षर व्यक्ती आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी लोकसहभागाचे आवाहन”