New regulations by State Government to prevent hospital fires.
रुग्णालयातल्या आगी रोखण्यासाठी राज्य सरकारची नवी नियमावली
मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना टाळता याव्यात यासाठीच्या उपाययोजनांबाबत राज्य सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबाबतचं परिपत्रक आरोग्य विभागानं आज जारी केलं. या परिपत्रकानुसार रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी सतत उपस्थित असणं बंधनकारक असणार आहे.
ज्या रुग्णांना शारिरीक हालचाल करणं शक्य नाही, अशांवर सातत्यानं देखरेख करता यावी यासाठी, असे रुग्ण जिथे दाखल असतील तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कर्तव्य निश्चित करावीत, तसंच डॉक्टर आणि कर्मचारी कायम उपस्थित राहतील याची सुनिश्चिती करावी, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची दृश्य सातत्यानं तपासावीत, आपत्कालीन स्थितीतल्या कृतींसंदर्भात नियमीत प्रात्यक्षिकं करावीत, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
याव्यतिरिक्त केलेल्या सूचनांनुसार, रुग्णालय परिसरात हाताळायला सुलभ अग्निरोधक बसवून, त्यांची नियमीत देखभाल करणं, फायर सेफ्टी ऑडिटअंतर्गत सुचवलेली कार्यवाही करणं बंधनकारक असणार आहे.
आपत्कालीन स्थितीतल्या कृतींसंदर्भातल्या प्रात्यक्षिकांच्या वेळी सर्व कामगारांना अग्निशामक यंत्रांचा वापर करायचे प्रशिक्षण द्यावं लागेल, तसंच या प्रात्यक्षिकांचं छायाचित्रांच्या माध्यमातून दस्तावेजीकरण करावं लागणार आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाला अग्निशामक यंत्र कायम वापरायोग्य परिस्थितीत असतील याची सुनिश्चिती करावी लागेल, आग लागल्याच्या काळात काय करावं यासंदर्भातल्या सूचना संबंधित ठिकाणी दर्शनी भागात लावणं, अग्निशमन दलाची संख्या, प्रशिक्षित स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष याबाबतची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक असणार आहे.
यासोबतच रुग्णालयातल्या प्रत्येक कक्षात ये – जा करायच्या ठिकाणी कोणतेही अडथळे नसतील याची सुनिश्चिती करावी लागेल, रुग्णालयात सर्व महत्वाच्या ठिकाणी आपत्पाकालीन परिस्थित बाहेर पडायचे मार्ग उपलब्ध करून द्यावे लागतील, तसंच माहितीही संबंधित ठिकाणी लिहावी लागणार आहे.
रुग्णालयांमध्ये तातडीनं पाणी फवारण्याची व्यवस्था, स्मोक डिटेक्टर स्थापित करावेत अशी सूचनाही आरोग्य विभागानं केली आहे.