Ninety-one per cent of citizens over the age of 18 in the state received the first dose of the corona vaccine.
राज्यातल्या १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ९१ टक्के नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा.
मुंबई: राज्यातल्या १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे ९१ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे तर १५ ते १८ वयोगटातल्या ५२ टक्क्यांहून अधिक मुलामुलींना या लशीची पहिली मात्रा मिळाली आहे.
राज्यातल्या ६७ टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्राही मिळाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, भंडारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे. तर नंदूरबार, बीड, नांदेड, हिंगोली, धुळे, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.
मुंबई, भंडारा, पुणे, सिंधुदुर्ग आणि रायगडमधल्या ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. नंदूरबार, अकोला, औरंगाबाद, बीड, बुलढाणा यासारख्या ठिकाणी निम्म्याहून कमी नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे.
१५ ते १८ या वयोगटाच्या लसीकरणात भंडारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, सातारा, लातूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आघाडीवर असून याठिकाणच्या ६५ टक्क्यांहून अधिक मुलामुलींनी पहिली मात्रा घेतली आहे. पण सोलापूर, चंद्रपूर आणि नंदूरबारमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी मुलामुलींनी पहिली मात्रा घेतली आहे.