No matter how much the opposition makes a fuss, Nawab Malik will not resign – Jayant Patil
विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही – जयंत पाटील
मुंबई : विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजपा राजीनाम्याची मागणी करत आहेत, असं ते म्हणाले. नवाब मलिक यांच्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिलं जाईल, पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात. म्हणून विरोधकांनी चहापानाला यावं. असं आवाहनही जयंत पाटील यांनी केलं.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आढावा बैठक अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातल्या कामकाजाबाबत चर्चा केली जाईल.
संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.