महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव

Celebration of Shivjanmotsav at Fort Shivneri

Proposal for the nomination of 11 forts in Maharashtra to UNESCO

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव

गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा या हेतूने भारत 2024-25 या वर्षासाठी मराठा काळातील गडकिल्ल्यांचे “मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया” अर्थात भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये” अंतर्गत नामांकन पाठवणार

17व्या आणि 19व्या शतकात विकसित झालेली “भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये”, त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत

नवी दिल्ली : भारत 2024-25 या वर्षासाठी “मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया” अर्थात भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये” यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी नामांकन देणार आहे. या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला, अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे.Shivneri-Fort-Main-Entrance Gate

17व्या आणि 19व्या शतकात विकसित झालेली “भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये”, त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत. किल्ल्यांचे हे एकमेवाद्वितीय जाळे, त्यांच्या महत्वानुसार ठरवलेला त्यांचा क्रम, व्याप्ती आणि प्रतीकात्मक वैशिष्ट्यांमध्ये असलेले वैविध्य, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, मनमोहक कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पातील पूर्व घाट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य, भूप्रदेश आणि भौतिक वैशिष्ट्ये यांचा अनोखा मिलाफ आहे.

महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडियासाठी निवडण्यात आले आहेत. यापैकी आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. तर उर्वरित साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं संरक्षित केले आहेत

भारतातील मराठा लष्करी भूदृश्यांमधील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, राजगड आणि जिंजीचा किल्ला हे डोंगरी किल्ले आहेत, प्रतापगड हा डोंगराळ आणि वन प्रदेशातील किल्ला आहे, पन्हाळा हा डोंगरी आणि पठारी किल्ला आहे, विजयदुर्ग हा किनारी भागातील किल्ला असून खांदेरी किल्ला आणि सुवर्णदुर्ग किल्ला हे बेटांवर बांधलेले किल्ले आहेत.

मराठा लष्कराची मुहूर्तमेढ १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात रोवली गेली. त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांच्या काळापर्यंत ही घोडदौड कायम राहिली.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी सांस्कृतिक स्थळांसाठी सहा निकष (i ते vi) आणि नैसर्गिक स्थळांसाठी चार निकष (vii ते x) आहेत.

भारतातील मराठा लष्करी भूदृश्यांचे नामांकन श्रेणी (iii) अंतर्गत आहे : वारसा स्थळामधून सांस्कृतिक परंपरेची किंवा जिवंत किंवा लुप्त झालेल्या सभ्यतेबद्दल अद्वितीय किंवा किमान अपवादात्मक साक्ष मिळणे , हा निकष येथे लागू होतो त्याचप्रमाणे निकष (iv): वास्तूच्या स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण, वास्तुशिल्प किंवा तांत्रिक रचना किंवा लँडस्केप जे मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे आणि काळ मूर्तिमंत स्वरूपात दर्शवते आणि निकष (vi): ज्यामध्ये एखादी घटना किंवा जिवंत परंपरा, कल्पना किंवा विश्वास, तसेच वैश्विक महत्त्व असलेल्या उत्कृष्ट कलात्मक आणि साहित्यिक कृतींशी थेट किंवा मूर्तपणे संलग्न असणे.

भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक, सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र प्रकारचे आहे. महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी (1983), एलोरा लेणी (1983), एलिफंटा लेणी (1987), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) (2004), व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (2018) हे सांस्कृतिक श्रेणीत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट (2012) यांचा समावेश नैसर्गिक श्रेणी मध्ये केला आहे. भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये ही 2021 मधील जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेशासाठी नामांकित केलेली सहावी सांस्कृतिक संपदा आहे.

गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

याविषयी सांगताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार महाकाव्य रामायणातील प्रसंग
Spread the love

One Comment on “महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *