Meeting of political parties organized by the Office of the Chief Electoral Officer
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राजकीय पक्षांची बैठक
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची देण्यात आली माहिती
मुंबई : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणीकृत राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या बैठकीला संबोधित केले. त्यांनी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच नवमतदार नोंदणी, नाव वगळणी, नाव-पत्ता-लिंग इ. तपशिलांतील दुरुस्त्या यांची सद्यःस्थिती सांगण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी, तृतीयपंथी समुदाय, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष शिबिरे आणि ग्रामसभा यांची माहिती देण्यात आली.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (बूथ लेवल असिस्टंट – बीएलए) नेमण्यास सांगण्यास आले. तसेच या साहाय्यकांनी मतदारसंघ पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बूथ लेवल ऑफिसर यांना) सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणी सत्रांविषयी उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले. श्री.देशपांडे यांनी उपस्थितांच्या सर्व शंकांच निरसन केले. त्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तसेच समाजमाध्यमांवरून नवमतदारांना नाव नोंदणी करण्यास सांगावे, असे आवाहन केले.
सदर बैठकीला सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. तसेच आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राजकीय पक्षांची बैठक”