Opposition demands resignation of Nawab Malik
विरोधकांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई: आज ना उद्या कधीतरी हे घडेल याची आम्हाला खात्री होती. नवाब मलिक हे जाहीरपणे बाहेर बोलतात, त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होईल, असं वाटतंच होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी सागितलं.
नवाब मलिक यांच्याविरोधात कोणती केस काढली याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. नवाब मलिक यांना सकाळी चौकशीसाठी नेलं तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं सुरू केली होती. तसंच या लोकशाहीविरोधी कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मलिक यांच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातल्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी या मंत्र्यांची बैठक झाली.
मलिक यांना करण्यात आलेली अटक दुर्दैवी असल्याची प्रक्रिया राज्यातले मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. आता कायदेशीर लढाई सुरू होईल. गेल्या २ वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आता नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार नसल्याचं ते म्हणाले.