दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे

Ramesh Bais Governor of Maharashtra महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Society should cooperate with organizations working for disabled children

दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे-राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेटRamesh Bais Governor of Maharashtra महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा संस्थांच्या विकासात समाजाने कर्तव्यभावनेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल श्री.बैस यांनी केले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रामबाई बैस, संस्थेचे चेअरमन पद्मश्री प्रतापराव पवार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवर,संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे आदी उपस्थित होते.

श्री. बैस म्हणाले की, बाल कल्याण संस्था दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी चांगले कार्य करणारी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणारी आहे. ही संस्था मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे. दिव्यांग मुलांचे शिक्षण आणि विकास ही शासन किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी सहकार्य करावे.

बाल कल्याण संस्थेला भेट देऊन आनंद झाल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, बाल कल्याण संस्थेला राजभवनाची जागा घेण्याचा त्या काळात घेण्यात आलेला निर्णय दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात महत्वाचा ठरला आहे. संस्थेत मुलांना गीत, संगीत, शिल्पकला, संगणक, नृत्य, खेळ अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेचे कार्य लक्षात घेता संस्था समाजाच्या कौतुकास पात्र असून संस्थेसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दिव्यांग मुलांसोबतचे अनुभव सांगताना राज्यपाल झाले भावूक

दिव्यांग व्यक्तींसाठी धोरणाचा मसुदा बनविण्याचे कार्य करताना आलेले अनुभव राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले. हे अनुभव सांगताना राज्यपाल महोदय भावुक झाले. दिव्यांग मुलांना ईश्वराने वेगळी शक्ती प्रदान केली असून त्याआधारे ही मुले आपले विश्व घडवितात. त्यांना दयेची नव्हे तर आशीर्वाद आणि प्रोत्साहनची गरज आहे. त्यांना प्रेम दिल्यास ते चांगले यश संपादन करू शकतात असे सांगून इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे असे श्री.बैस म्हणाले. याच भावनेतून प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कल्याण संस्था चांगली प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संस्थेच्या अध्यक्षा रामबाई बैस यांच्याकडून संस्थेसाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर

श्रीमती बैस म्हणाल्या, संस्थेत आल्यानंतर आई आणि आजी म्हणून विद्यार्थ्यांना भेटताना आनंद होत आहे. या संस्थेत मुले मनोरंजनातून चांगली कौशल्ये आत्मसात करत आहेत. बाल कल्याण संस्था यासाठी चांगले प्रयत्न करीत आहे. सुवर्ण पदक विजेत्या गायत्री भालेराव हिचे त्यांनी कौतुक केले. असे यश संपादन करून संस्थेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाल कल्याण संस्थेला ५ लाख रुपये देण्याची घोषणा श्रीमती बैस यांनी केली.

श्री.पवार म्हणाले की, अनेकांनी कष्टाने संस्था वाढवली आहे. नव्या कल्पना राबवून सुरू केलेल्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा होत आहे. संस्थेतील संशोधन आणि विकासकार्याचा राज्यालाही लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मानद सचिव डॉ.संजीव डोळे यांनी संस्थेतील उपचारपद्धतीविषयी माहिती दिली.

तत्पूर्वी राज्यपाल श्री.बैस यांनी संस्थेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलेला दाद दिली. यावेळी जर्मनी येथे झालेल्या दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती दिव्यांग विद्यार्थिनी गायत्री भालेराव हिचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रीमती पानसे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेत दिव्यांग मुलांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक आणि उपचाराच्या सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

बालकांच्या कलेत राज्यपाल रमले

राज्यपाल श्री.बैस यांनी मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींची बारकाईने माहिती घेतली. मुलांच्या मूर्तिकलेचे कौतुक करतांना त्यांनी स्वतः मूर्तीच्या कलाकुसरीचा कामात सहभाग घेऊन मुलांचा उत्साह वाढवला आणि त्यांना मूर्तिकलेविषयी माहिती दिली. राज्यपाल महोदयांनी स्वतः केलेल्या कलाकृतींची छायाचित्रे मुलांना दाखवली आणि त्यांना मूर्तिकलेतील बारकावे सांगितले. त्यांनी जलतरण तलावात मनोरे साकारणाऱ्या मुलामुलींना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. त्यांनी गायन, वादन कला प्रशिक्षण कक्षाला भेट देऊन मुलांमधील विविध कलागुणांचे कौतुक केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार; इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
Spread the love

One Comment on “दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *