Planned development of the city considering the growing population
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचे लोकार्पण
पुणे : पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ असण्याची गरज आहे. महानगरपालिकेने शहरीकरणाचा वेग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरूवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण उपक्रमांची सुरूवात होत आहे. वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पांमुळे मदत होईल. सांडपाणी नदीनाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षाला मुर्तरूप देण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून केले आहे. शिक्षण, आरोग्यासोबत रोजगार महत्त्वाचा असल्याने बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनविता येईल. त्यासोबत महानगरपालिकेने कौशल्यावर आधारीत कार्यक्रमाची स्तुत्य सुरूवात केली आहे. मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाऊन हॉल महत्वाचा ठरेल. आज शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचादेखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल, शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
आमदार श्री.लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात पुढील २० वर्षांचा विचार करून विकासकामे करण्यात आली आहेत. भविष्यातले शहर म्हणून विविध सुविधा येथे निर्माण करण्यात येत आहेत. खेळाडुंसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. मोशी येथे 700 खाटांचे रुगणालय उभारण्यात येणार असून त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला चांगले उपचार देता येतील असे त्यांनी सांगितले. लोकार्पण करण्यात आलेले विविध कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा