Appeal of Agriculture Department to participate in Pradhan Mantri Crop Insurance Scheme
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
पुणे : चालू रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.
योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. रब्बी ज्वारी या पिकासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
सन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन http://pmfby.gov.in या पार्टलवर स्वत: शेतकरी, बँक, विमा कंपनी अथवा सामुहिक सेवा केंद्रामार्फत नोंदणी करता येईल.
योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रत्येक अर्जासाठी ४० रुपये देण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ १ रुपया भरुन नोंदणी करावी. अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, नजीकची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
पुणे, हिंगोली, अकोला, धुळे व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स.कं.लि., सातारा, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग घ्यायचा नसेल तर विहित मुदतीत बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन पद्धतीवरील कार्यशाळा संपन्न
One Comment on “प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन”