Special campaign for inclusion in Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम
पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार
पुणे : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.
पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम”