Dandiya organizers in the state are obliged to have primary health facilities and ambulances
राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार
मुंबई : मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आशाप्रकारचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाचा जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तसेच कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे, त्यामुळे अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबाबत मुंबईतील ‘गुजरात समाचार’ या वृत्तपत्राचे संपादक निलेश दवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याना तसे निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून मुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्देश दिले आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा,रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक”