Prime Minister inaugurates Post Budget webinar of Ministry of Health and Family Welfare
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्र अधिक सार्वत्रिक आणि समावेशी करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करणाऱ्या तीन घटकांचा पंतप्रधानांनी उहापोह केला. पहिला घटक म्हणजे, आधुनिक वैद्यक शास्त्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ यांचा विस्तार. दुसरा घटक म्हणजे ‘आयुष’सारख्या पारंपारिक भारतीय वैद्यक प्रणालीमधील संशोधनाला प्रोत्साहन आणि आरोग्य सेवा यंत्रणेत त्याचा सक्रीय सहभाग. आणि तिसरा घटक म्हणजे आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत आणि प्रत्येक भागापर्यंत किफायतशीर दरात आरोग्य सेवा पोहोचविणे.
प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी देशभरात दीड लाख आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे उभारण्यासंदर्भातील काम अत्यंत वेगाने सुरु आहे अशी माहिती पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दिली. आतापर्यंत अशी 85,000 हून अधिक केंद्रे नागरिकांना नियमित तपासणी, लसीकरण तसेच वैद्यकीय चाचण्या करण्याची सुविधा पुरवीत आहेत. या केंद्रांमध्ये मानसिक समस्यांबाबत आरोग्य सेवा देखील सुरु करण्याविषयीची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे असे ते म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ वाढविण्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले, “आरोग्य सेवा क्षेत्रात मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्यक्षेत्रात अधिकाधिक कुशल व्यावसायिक तयार करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणूनच, आरोग्य क्षेत्रातील शिक्षण तसेच आरोग्यसेवा संबंधी मनुष्यबळाचा विकास यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.”
भारतातील आयुष उपचारपद्धती जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणातील स्वीकारली जात आहे याकडे पंतप्रधानांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि जागतिक आरोग्य संघटना त्यांचे पारंपरिक औषधांचे एकमेव जागतिक केंद्र भारतात उभारणार असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली. “आपण स्वतःसाठी तसेच संपूर्ण जगासाठी देखील आयुष पद्धतीद्वारे अधिक उत्तम प्रकारे उपचारप्रणाली निर्माण करू शकतो हे आता आपल्या कृतीवर अवलंबून आहे.”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.