Assured Progression Scheme for non-teaching staff in private recognized schools
खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना
शासन निर्णय जारी
मुंबई : शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. तसेच थकबाकी देय होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वित्त विभागाच्या 1 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करुन शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. याद्वारे 12 वर्षे व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
तसेच ही योजना 5 जुलै 2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू करण्यात आली आहे. तथापि, राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात सातत्याने मागणी होत होती. तसेच उच्च न्यायालयाने 19 ऑगस्ट 2014 रोजी राज्यातील खासगी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सत्वर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना”