ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचं निधन

Senior thinker Prof. Hari Narke passed away ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Senior thinker Prof. Hari Narke passed away

ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचं निधन

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे,” -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचं आज हृदयाच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. नरके आज सकाळी एका वैयक्तिक कामासाठी पुण्याहून मुंबईला येत असताना त्यांना रस्त्यातच अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्या नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात राज्यातल्या सर्व थरातून शोक व्यक्त केला जात आहे.

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“महाराष्ट्राच्या विचार – व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले – शाहू – आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे,” असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

“ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस अपल्या संदेशात म्हणतात, “प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

प्रा.हरी नरके यांच्या निधनानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला त्यांच्या निधनानं ओबीसी चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आदरांजली वाहिली.

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

फुले- आंबेडकरवादी विचारांचा लढवय्या विचारवंत आणि अनुयायी आपल्यातून हरवला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक
Spread the love

One Comment on “ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचं निधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *