Public Awareness of Govt’s Public Welfare Schemes through Folk Art Squads: Initiative of District Information Office
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकांद्वारे जनजागृती : जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
बारामती : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे.
आज दौंड तालुक्यातील मौजे यवत आणि वरवंड येथे या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहिती सहायक रोहिदास गावडे उपस्थित होते.
राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत असा या मोहिमेचा उद्देश आहे. एक प्रकारे ‘योजनांची माहिती आपल्या दारी’ असे या जनजागृती मोहिमेचे स्वरुप असणार आहे.
प्रसन्न प्रॉडक्शन कलापथकाने आज येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, मीनाताई ठाकरे जल सिंचन योजना, ऊसतोड कामगारांसाठी विमा योजना, रमाई आवास योजना, कामगारांसाठी ई-श्रमिक कार्ड योजना, महामेट्रो, महामार्ग, रस्ते सुधार योजना, मुला मुलींसाठी मोफत शिक्षण यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती दिली. या कला पथकाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.