Citizens should take advantage of public welfare schemes
नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे :सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
कोथरूड येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेला भेटीप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात जनहिताच्या अनेक चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून होत आहे. अनेक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे अशा योजना आपल्या दारापर्यंत आल्या आहेत. या यात्रेत पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना अशा योजनांचा लाभ देण्यासोबत आरोग्य तपासणीदेखील करण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री श्री.पाटील आणि खासदार श्री. जावडेकर यांनी यात्रेला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. श्री.पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले.
यात्रेत नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित आरोग्य तपासणीचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा”