Family and heart connection with Pune
पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध: ज्योतीरादित्य सिंधीया
महाराष्ट्रातील मुख्य शहर म्हणून पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न
लवकरच होणार नवीन विमानतळाचे लोकार्पण
पुणे : पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहर म्हणून पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व प्रगती हे आमचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी आज पुण्यात केले.
पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचा उद्घाटनपूर्व आढावा घेण्यासाठी ते पुणे विमानतळावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी सिंधीया बोलत होते.
आपले मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, पुणे हे आमचे मुख्य शहर आहे, ऐतिहासिक, संस्कृतीचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे सम्राज्याची राजधानी, माझ्या कुटुंबाचे प्रमुख महादाजी शिंदे यांचे देखील हे पुणे आहे. या शहराचा विकास आणि नागरी विमान वाहतुकीमधील याची प्रगती पंतप्रधानांचा संकल्प आणि आदेश याने विकास तसेच प्रगतीच्या संस्कृतीची सुरुवात झाली आहे.
पुण्याची क्षमता मोठी आहे. माहिती आणि तंत्रज्ञान, शिक्षण, निर्मिती या सर्वाचे देशपातळीवरील केंद्र पुणे आहे. पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांची एकच विचारधारा आहे की पुण्याला नागरी विमान वाहतुकीमध्ये अग्रस्थानी आणायचे आहे. त्याच विचारांचा परिपाक म्हणजे हे नवीन टर्मिनल आहे. याची तयारी आता पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
52 हजार स्क्वेअर मीटर जागेत हे विमानतळ उभे राहिले आहे. भविष्यातील गरजेच्या दुप्पट क्षमतेचे हे टर्मिनल आहे. 2014 मध्ये देशातील 17 शहरांसोबत पुणे विमानतळ जोडले गेले होते व गेल्या 9 वर्षात ते 37 शहरांशी जोडले गेले आहे. सोबत सिंगापूर व दुबई या आंतरराष्ट्रीय थेट विमानसेवा देखील सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
माझी अशी धारणा आहे की विमानतळ हे काच आणि सिमेंटची रचना नाही तर शहरात येणाऱ्या प्रवश्यासाठी शहराचा अनुभव करण्यासाठी प्रथम द्वार आहे. विमानतळाच्या यातील आणि बाहेरील बाजूस त्या शहराचा, क्षेत्राचा आणि राज्याचा इतिहास-संस्कृती प्रतिबिंबीत होणे अनिवार्य आहे. देशामध्ये वेगवेगळी आणि अलौकिक संस्कृती आहे; यासर्वाचे प्रदर्शन विमानतळांवर व्हावे, असे वाटते, असे मत ज्योतीरादित्य यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या या विमानतळावर देखील बाहेरच्या बाजूला शनिवार वाड्याच्या धर्तीवर रचना उभारण्यात आली आहे. दीपमाळ देखील इथे तुम्हाला दिसेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा देखील येथे नतमस्तक होण्यासाठी आहे, जो प्रेरणा देण्याचे काम करील. याशिवाय महाराष्ट्रातील विविधतेचे चित्र इथल्या भिंतींवर दिसेल. हे विमानतळ म्हणजे महाराष्ट्राचा जीवंत आत्मा आहे. पंतप्रधान आणि आमची हीच कल्पना होती, अशी भावना त्यांनी मांडली.
आज मी यासर्वाचे परीक्षण करून काही सूचना केल्या आहेत आणि लवकरच या वास्तूचे उद्घाटन होऊन लोकार्पण होईल, अशी माहिती ज्योतीरादित्य सिंधीया यांनी यावेळी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध: ज्योतीरादित्य सिंधीया”