Request for correction regarding double name registration and same photograph
दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन
मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु
१ जानेवारी २०२४ पर्यंत दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन
पुणे : निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे २८ हजार तर समान छायाचित्राचे १ लाख ४२ हजार ३४९ मतदार असून संबंधितांनी त्यांना मिळालेल्या नोटीशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असलेचे आढळुन आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एका पेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.
या नोटीशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतिसह अपलोड करावे किवा संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी.
या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनाप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही श्री. देशमुख यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन”